दुर्गासप्तशती / शक्तीउपासना पुरुषांना काय ज्ञान देते ?

तुमच्या धर्मावर कोणी आक्रमण करत असेल. शाब्दिक, अथवा शारीरिक त्याचा त्याच पद्धतीने प्रतिवाद करणे हे तुमचे कर्तव्य आहे. जर कोणी तुमच्या धर्माच्या बद्दल अश्लाघ्य आणि अर्वाच्च बोलणार असेल त्याचा सुसंस्कृत आणि सभ्य प्रतिवाद तुम्ही कमकुवत आहात हे दर्शवते. जर तुमच्या कडून सुद्धा तितकाच तिखट प्रतिकार झाला तर समोरचा पुढच्या वेळी टीका करायची हिम्मत करणार नाही. तुम्ही नको तिथे नेभळट पणा केला तर त्यांचे धाडस वाढेल. हे समजून घेण्याची तुमची क्षमता विकसित करा. जे तुमच्या धर्मावर अश्लाघ्य हल्ला करतात त्यांना शरण आणणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांची सर्व नाकेबंदी करा आणि त्यांना शरण आणा. पाठीवर हल्ला न करता पोटावर हल्ला केला तर तो अधिक प्रभावी असतो आणि त्याचा परिणाम लवकर नष्ट होत नाही. 

घटनेतील धार्मिक स्वातंत्र्य हे कलम हिंदू द्वेष करण्याचा परवाना नाही. कोणी त्याचा तसा वापर करत असेल तर त्याला सर्व मार्गाने ठेचून काढा…

दुर्गासप्तशती /शक्तीउपासना स्त्रियांना काय ज्ञान देते ?

दुर्गासप्तशती हि कथा म्हणून वाचा. ब्रह्मदेवाचा जीव घेण्यास आतुर झालेल्या मधु कैटभाला मारण्यासाठी सुद्धा मायापटल नष्ट होऊन कालीमातेला प्रेरणा द्यावी लागली तेव्हा विष्णूने पराक्रम केला. महापराक्रमी महिषासुर सगळ्या देवांना पराभूत करतो. त्यावेळी त्या पराभूत पुरुष देवांच्या चेतना एकत्र येऊन महालक्ष्मी स्वरूपास प्राप्त होतात आणि त्या घोर पराक्रम करून महिषासुराला नष्ट करतात. शुंभ निशुंभ त्रैलोक्याचे स्वामी होतात म्हणून पार्वतीच्या शरीरातून महासरस्वती प्रकट होते ती सगळ्या मातृकांना सहाय्यास घेऊन त्यांचा नायनाट करते.

राक्षस मायावी विविध युद्धात प्रवीण. देव त्यांच्याशी सरळ प्रामाणिकपणे लढतात आणि त्यांच्यापुडे पराभूत होतात. सत्प्रवृत्ती नेहमीच अपप्रवृत्तींशी सरळ मैदानात लढत देऊन हरत असते. देवी मात्र हे नैतिकतेचे आणि सभ्य लढाईचे बंधन नाकारते. ती तमाम राक्षसांशी त्यांच्या मैदानात त्यांच्या आवडत्या शस्त्राने ते लढत असताना त्यांच्यापेक्षा अधिक पराक्रम गाजवून त्यांना पराभूत करते. ती महिषासुर किंवा शुंभ निशुम्भाशी थेट मल्लयुद्ध करते. त्यांनी छातीवर केलेले प्रहर सहन करते.. विनयभंग केला म्हणून रडत बसत नाही. तर तितक्याच ताकदीने त्याच्या छातीवर पायाने प्रहार करते आणि त्याला गोल फिरवून फेकून देते. देवी ज्या पद्धतीने या राक्षसांशी लढते आणि त्यांचा वध करते. तितक्याच क्रौर्याने त्यांचे रक्त प्राशन करते हे समजून घेणे आजच्या स्त्रीला अत्यंत आवश्यक आहे.

आपण कलियुगात आहोत. आज कोणताही श्रीकृष्ण अब्रू राखायला येणार नाही. आज कोणताही कायदा तुमच्या शीलाचे रक्षण करण्यास समर्थ नाही. या राक्षसांच्या जगात तुम्ही एकट्या आहात. तुमच्या कपड्यातून, वर्तनातून तुम्ही कधीही कोणत्याही पुरुषाला उत्तेजित होईल असे वर्तन करू नका. तुम्ही उपभोगाची वस्तू नाही आहात. तुम्हाला एक व्यक्ती म्हणून असणारा मान सन्मान तसे वर्तन करून मिळवायचा आहे. पण असे चांगले आणि नैतिकतेने वागूनही कोणी तुमच्याशी गैरवर्तन करत असेल तर त्या क्षणी त्याच्या कानाखाली जाळ काढा. तो कोणीही असला त्याचे सामाजिक स्थान काहीही असले आणि तो भविष्यात तुमचे कितीही वाकडे करू शकत असला तरी सुद्धा कोणतीही भीड बाळगू नका.

दुर्गासप्तशतीचे प्राकृत अथवा संस्कृत पठन आजच्या प्रत्येक स्त्रीने वर्षातून कमीतकमी एकदा आणि जास्तीत जास्त ४ वेळा करावे. ते वाचताना सुद्धा बाहू स्फुरण पावतात. देवीचा पराक्रम तुम्हाला सुद्धा सकारात्मक करतो. तुमचे सुप्त शौर्य जागे करतो. तुमच्यावर कोणीही हल्ला केला तुम्हाला त्रास दिला तर स्वताचा जीव वाचवणे हि स्वाभाविक कृती असते. परंतु दुर्गा सप्तशतीचे पठन तुमच्यातील पुरुषार्थ जागा करेल. आपल्यावर कोणी हल्ला केला तर प्रतिकार करण्याची मानसिकता विकसित करेल. स्त्री प्रतिकार करेल याची कोणताही पुरुष कल्पना करू शकत नाही. तुमचा प्रतिकार त्याला पलायन करण्यास भाग पाडेल. समजा त्यांची संख्या एका पेक्षा जास्त असेल तरी न घाबरता लढा. मरायचेच असेल, अब्रूची हानी होणारच असेल तर इतक्या सहज मी शरण जाणार नाही हे पक्के ठरवा आणि प्राणांतिक लढा द्या. स्त्रीच्या अब्रूवर हात घालणारा कोणीही असू दे तो राक्षस असतो आणि राक्षसाला जीवानिशी ठार मारण्याचा अधिकार तुम्हाला दुर्गेने प्रदान केला आहे.. जगातील कोणताही कायदा स्वसंरक्षण करताना केलेल्या हत्येची शिक्षा देत नाही हे लक्षात ठेवा.

ज्या प्रमाणे देवीने मल्लयुद्ध करून राक्षस संपवले तशीच मानसिकता विकसित करा. त्याच्या जोडीला शारीरिक बळ प्राप्त व्हावे म्हणून शिस्तबद्धपणे कराटे किंवा तत्सम कला शिका. तुम्हाला आवडलेल्या पुरुषाशी रत होणे हा तुमचा अधिकार आहे आणि तुमच्या इच्छेशिवाय तुमच्या अंगाला स्पर्श करण्याचा कुणालाही अधिकार नाही. या दोन्ही अधिकारांचे पालन अत्यंत दक्षपणे आणि परिपक्व होऊन करा.

नवरात्राचा अर्थ नऊ रंगी वस्त्रे धारण करून नटणे मुरडणे नसून आपल्या मध्ये शक्तीस्वरुपाची नऊ तत्वे स्थापन करणे आहे.. हे प्रत्येक स्त्री पुरुषाने लक्षात ठेवावे.

©सुजीत भोगले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *